Headlines
Loading...
छेडछाडीमुळे महिलेची रिक्षातून उडी

छेडछाडीमुळे महिलेची रिक्षातून उडी

छेडछाडीमुळे महिलेची रिक्षातून उडी
म. टा. खास प्रतिनिधी अंधेरी : रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राने छेडछाड केल्यामुळे महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना अंधेरी परिसरातून समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अंधेरी पोलिसांनी नराधम रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राला अटक केली. दरम्यान धावत्या रिक्षातून उडी मारल्याने ही महिला जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पश्चिम द्रूतगती महामार्गवरील गुंदवली सर्व्हिस रोडवरून एक महिला रिक्षातून चालली होती. मागच्या सीटवर तिच्या बाजूला एक प्रवासी बसला होता. 


काही अंतर पुढे रिक्षा गेल्यानंतर शेजारील प्रवाशाने महिलेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. न करण्यास सांगितल्यानंतरही हा प्रवासी अंगाला स्पर्श करीत असल्याने या महिलेने चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र मागे बसलेला प्रवासी त्याचाच मित्र असल्याने चालकाने रिक्षा थांबवली नाही. रिक्षाचालक आणि त्याचा मित्र छेडछाड करीत असल्याचे पाहून या महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारली. या घटनेत महिलेच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. महिलेने रिक्षातून उडी मारल्याचे पाहून दोघांनी रिक्षासह तेथून पळ काढला. या घाईगडबडीत महिलेला रिक्षाचा नंबरही घेता आला नाही. 


मात्र तरीही या दोन नराधमांना धडा शिकविण्यासाठी या महिलेने अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. महिलेने छेडछाड करणाऱ्या नराधमांचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी रेखाचित्र काढले. त्याचप्रमाणे रिक्षाच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात आले. दोन नराधमांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. रेखाचित्र, सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेला रिक्षाचा क्रमांक, खबऱ्यांमार्फत अविरत शोधमोहीम हाती घेत पोलिसांनी कांदिवली येथे राहणारा रिक्षाचालक सूरजकुमार दूधनाथ राजभर आणि त्याचा मित्र अनिकेत महावीर जैस्वाल या दोघांना अटक केली. चौकशीमध्ये या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले.

0 Comments: