रुग्णवाहिकांकडून लूट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना रुग्णवाढीचा वैद्यकीय क्षेत्राइतकाच खासगी सेवेनेही फायदा उठवला आहे. रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा उठवत रुग्णवाहिका एक किमी अंतरासाठी आठ ते दहा हजार रुपये उकळत आहेत. मुंबईत अंदाजे दोन हजार खासगी रुग्णवाहिका असून एक रुग्णवाहिका रुग्णाचे घर ते रुग्णालय अशा दररोज तीन ते चार फेऱ्या मारते. यातून सर्व रुग्णवाहिका मिळून दररोज सुमारे एक कोटी रुपयांची कमाई करीत असल्याचा अंदाज आहे. महापालिकेकडे फक्त ४४७ रुग्णवाहिका व ३५ शववाहिन्या आहेत. २४ विभागांसाठी दहा रुग्णवाहिका भाड्याने घेण्यात आल्या असून एका रुग्णवाहिकेकडे दोन ते तीन विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. करोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णवाहिका पुरेशा पडत नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सर्व मदार खासगी रुग्णवाहिकांवर आहे. मुंबईत अंदाजे दोन हजार खासगी रुग्णवाहिका तसेच सामाजिक संस्थांच्या ५०० रुग्णवाहिका आहेत. काही सामाजिक संस्था विनामूल्य, तर काही अल्प शुल्क घेऊन सेवा देतात. मागील महिनाभरापासून मुंबईत दररोज आठ ते दहा हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. यातील ५० टक्के रुग्ण रुग्णवाहिकेने रुग्णालयांत जात असल्याचा अंदाज असून रुग्णवाहिका आठ, दहा ते बारा हजारापर्यंत शुल्क आकारत असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. एक ते तीन किमी अंतरासाठी यापूर्वी दोन हजारापर्यंत शुल्क आकारले जायचे. मात्र आता आठ ते दहा हजार रुपये आकारले जात असल्याने रुग्णांची मोठी लूट होत असल्याचे लालबाग येथील सत्यवान नर यांनी सांगितले. आपल्या नातेवाईकांना नायर रुग्णालयात घेऊन गेलो असताना हा अनुभव आला असल्याचे नर म्हणाले. याबाबत मुंबई सेंट्रल येथील जीवन अॅम्ब्युलन्स सर्व्हिसच्या कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी एक ते दोन किमी अंतरासाठी आठ ते दहा हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती दिली. कार्डियाक म्हणजे ऑक्सिजन आणि डॉक्टर असलेली रुग्णवाहिका आणि साधी रुग्णवाहिका असे दोन प्रकार असून कार्डियाकसाठी एक ते दीड हजार रुपये जादा आकारले जातात, अशी माहिती देण्यात आली. खर्च खूप असल्याने दर जादा प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिका सॅनिटाइझ करावी लागत असून त्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो. ड्रायव्हर, डॉक्टर, कर्मचारी सगळ्यांना पीपीई किट द्यावा लागतो. ऑक्सिजन सिलिंडर ठाणे जिल्ह्यातून वाडा येथून आणावे लागतात. यामध्ये खूप खर्च होतो. त्यामुळे रुग्णवाहिकांचे दर जास्त असल्याचे जीवन अॅम्ब्युलन्सतर्फे सांगण्यात आले. सरकारी निर्णय बासनात खासगी रुग्णवाहिकांकडून लूट होत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी देखील नातेवाईकांकडून केल्या जात होत्या. त्यावर राज्य सरकारने दर निश्चित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र करोना नियंत्रणात आल्यानंतर सरकारला आपल्याच निर्णयाचा विसर पडला आहे. रुग्णवाहिकांना किमीप्रमाणे दर निश्चित करून देण्याची मागणी रुग्णांनी केली आहे.
Tags

Post a comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.