आरटीपीसीआर चाचणी वगळून सीटीस्कॅन नको

: करोना संसर्गाच्या निश्चितीसाठी न करता सीटीस्कॅन पद्धतीचा वापर केला जातो. मात्र, या चाचणीचा आधार घेत करोनासंसर्ग असल्याचा दावा करणे योग्य नाही. या चाचण्या कोणत्यावेळी करायच्या यासंदर्भात राज्याच्या टास्क फोर्स समितीने महत्त्वाचे निर्देश नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत. फुफ्फुस हे पाच भागांत विभागलेले असते. सीटीएसआय या सीटीस्कॅनच्या वैद्यकीय तंत्रामध्ये फुफ्फुसामधील किती भागांमध्ये संसर्ग आहे याचे वर्गीकरण केले जाते. या प्रत्येक भागावर किती परिणाम झाला आहे, याचे संख्यात्मक वर्गीकरण करून एकत्रित बेरीज केली जाते. मात्र, हा संसर्ग कोणत्या भागामध्ये किती खोलवर पसरलेला आहे, याचे निश्चित निदान करता येत नाही. त्यामुळे रेडिओलॉजिस्टने दिलेला स्कॅनचा स्कोअर व वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आकलन यात भेद झाला, तर त्याचा परिणाम थेट उपचारपद्धतीवर पडू शकतो, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. काही ठिकाणी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या पद्धतीचा वापरही सीटीस्कॅन स्कोअरिंगसाठी केला जात आहे. त्यातही तांत्रिक त्रुटी राहू शकते. त्यामुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, करोनाच्या संदर्भात असलेली इतर लक्षणेही महत्त्वाची निदर्शक ठरतात. केवळ या चाचण्यांच्या आधारे करोनाच्या संसर्गाचे निश्चित निदान होऊ शकत नाही. सीटी स्कॅनचे अहवाल ३० टक्के फॉल्स निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. याचाच दुसरा अर्थ असे अहवाल करोना संसर्गाचे नेमके निदान करू शकत नाहीत. या चाचण्यांचे १० ते ३० टक्के अहवाल हे फॉल्स पॉझिटिव्ह असतात. त्या रुग्णाला इतर कोणत्या स्वरूपाचा संसर्ग आहे यावरही अनेक बाबी निर्धारित असतात. सीटी स्कॅनची गुणवत्ता व स्कॅन काढणाऱ्या रेडिओलॉजीस्टचा अनुभवही लक्षात घ्यायला हवा, याकडे टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. पॉझिटिव्ह सीटी स्कॅन म्हणजे त्या रुग्णाला १०० टक्के कोविड असल्याचे निश्चित निदान होत नाही. करोनाच्या निदानासाठी रुग्णाचे निदान कोणत्या वेळी करण्यात आले, हा भागही महत्त्वाचा आहे. सीटी स्कॅन झाल्यानंतर रुग्णांच्या अहवालावर को-आरएडीएस एक तसेच दोन असा निष्कर्ष देण्यात येतो. त्याचीही कोणतीही गरज नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सीटी स्कॅन हा तिसऱ्या, सहाव्या वा नवव्या दिवशी करावा, असा कोणतेही निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे लक्षणांची तीव्रता अधिक वाढते आहे का, हे पाहण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरते. करोना संसर्गाचे निदान करण्यासाठी असलेली आरटीपीसीआर चाचणी न करता सीटी स्कॅन चाचणी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे रुग्णांवर व व्यवस्थेवर येणारा ताणही वाढता आहे. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सने या चाचण्यांच्या संदर्भात महत्त्वाचे वैद्यकीय निर्देश नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सादर केले आहेत. आरटीपीसीआर चाचणीची उपलब्धता नसल्यास ही चाचणी करावी. ज्या रुग्णामध्ये करोनाची बहुतांश लक्षणे आढळून आली आहेत, मात्र त्याचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशावेळी डॉक्टर सीटी स्कॅन चाचणीसाठी संमती देऊ शकतात. एखादी शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे आहे व त्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्यांची उपलब्धता नाही, अशावेळी ही चाचणी करता येऊ शकते. 'आयव्हरमॅक्टिन'विषयी निश्चितता नाही करोना संसर्गाच्या औषधोपचारामध्ये आयव्हरमॅक्टिन औषध दिले जाते. मात्र, वैद्यकीय संशोधनामध्ये वा उपलब्ध अभ्यासात या औषधाचा खात्रीलायक लाभ होतो, असे दिसून आलेले नाही. रेमडेसिवीरला पर्यायी औषध म्हणून बॅरिसीटीनिब या औषधांचा वापर करावा, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, हे औषध प्रचंड महाग आहे, तसेच त्याची गुणवत्ताही अद्याप सिद्ध झालेली नाही. त्यामुळे तुलनेने माफक किंमत असलेल्या स्टिरॉइडच्या जागी या औषधाचा समावेश करण्यासाठी टास्क फोर्सने हिरवा कंदिल दिलेला नाही. ज्या रुग्णालयामध्ये ३०० पेक्षा अधिक खाटा आहेत, तिथे ऑक्सिजनचे प्लान्ट उभारण्यात यावेत, अशीही सूचना टास्क फोर्सने केली आहे.
Tags

Post a comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.