करोनाकाळात वाढला प्लास्टिकवापर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईमध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा वाढला आहे. प्लास्टिक पिशव्यांचा केवळ भाजीबाजारातील वापरच नव्हे तर इतर दैनंदिन वापरातही वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या 'जागतिक वसुंधरा दिना'च्या पार्श्वभूमीवर पृथ्वीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, नैसर्गिक स्रोतांवरील भार कमी करणे हेही अपेक्षित आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळणे, शक्य तिथे पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करणे गरजेचे असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगत आहेत. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये महापालिकेशी संबंधित विविध संस्थांकडून १० हजार ३६ मेट्रिक टन प्लास्टिक गोळा करण्यात आले. तर या तुलनेत जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत १० हजार ५२५.३ मेट्रिक टन प्लास्टिक गोळा करण्यात आले. कचऱ्यातून आलेले प्लास्टिक वेगळे करून ते पुनर्वापरासाठी पाठवले जाते. यासाठी मुंबईमध्ये अनेक महिला काम करतात. मात्र या महिला एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत काम करू शकल्या नव्हत्या. त्यामुळे कचऱ्यातून येणारे प्लास्टिक वेगळे झाले नव्हते. तरीही हा आकडा सन २०१९च्या आकड्याच्या तुलनेत सुमारे ५०० मेट्रिक टनने अधिक आहे. यावरून करोना काळात वाढलेल्या प्लास्टिकच्या वापराचा अंदाज येतो. करोना विषाणूच्या भीतीमुळे पुन्हा एकदा गेल्या वर्षभरापासून प्लास्टिकचा वापर वाढला आहे. सामान प्लास्टिकच्या पिशवीतून आणून निर्जंतूक केल्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल, या विचाराने भाज्या, फळांसाठी सर्रास प्लास्टिकचा वापर होऊ लागला. यासंदर्भात राज्याच्या मृत्युदर नियंत्रण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी करोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात या आजाराच्या फैलावाबद्दल नेमकी माहिती नव्हती. मात्र आता त्याबद्दल अधिक स्पष्टता आली असल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये करोना हा खोकल्यातून, शिंकेतून, हवेतून पसरतो हे आढळून आले आहे. हा विषाणू कोणत्याही पृष्ठभागावरून पसरत नाही. त्यामुळे सामान कापडी पिशव्यांमधून आणून ते योग्य प्रकारे सॅनिटाइज केले तर चालू शकेल, असे ते म्हणाले. यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराची गरज नाही. त्यासाठी केवळ निर्जंतुकीकरण योग्य व्हायला हवे. भाज्या, फळे घेताना किंवा नंतर मास्कला हात लावणे, तोंडाला, नाकाला हात लावणे या गोष्टी टाळायला हव्या. निर्जंतुकीकरणानंतर हात स्वच्छ साबणाने धुणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. मास्कच्या विल्हेवाटीची चिंता केवळ प्लास्टिकच नाही तर नागरिक मास्कचीही योग्य प्रकारे विल्हेवाट लावताना दिसत नाहीत, असे निरीक्षण 'माझी वसुंधरा'चे ब्रँड अॅम्बॅसेडर आणि 'मिशन ग्रीन मुंबई'चे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी नोंदवले. जगभरात सध्या प्रतिमिनिटाला तीस लाख मास्कचा वापर होत असल्याचे सांगितले. यातील अनेक मास्क हे एकदा वापरून फेकून देण्यासारखे असतात. यातही काही प्रमाणात प्लास्टिकचा अंश असतो. हे मास्क नदीकिनारी, समुद्र किनारी, जलस्रोतांमध्ये पडल्याचे आढळून येत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागरूकता गरजेची विलगीकरणामधील रुग्णांना बाहेरून येणाऱ्या जेवणासाठीचे डबेही एकदाच वापरण्यासारखे असतात. यामुळेही प्लास्टिकच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. मात्र या काळात विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा पुनर्वापर, इकोब्रिक याबद्दल दिलेले मार्गदर्शन याची मदत होत असल्याचे निरीक्षण मुखर्जी यांनी नोंदवले. विद्यार्थी स्वतः प्लास्टिक इतर कचऱ्यापासून वेगळे करताना दिसत आहेत. याचा परिणाम हळूहळू मोठ्यांवरही होत आहे. प्लास्टिकच्या पुनर्वापराबद्दल लोकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवल्यास त्याचा फायदा येत्या काळात नैसरगिक स्रोतांमध्ये प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी होऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.